श्रीखंड

श्रीखंडाचा शोध  ज्यांनी कुणी लावला असेल त्यांना माझा त्रिवार मुजरा!! (अनेक पदार्थांचा शोध कसा लागला असेल त्याच्या गोष्टी लिहायच्यात कधीतरी मला)... चक्क्याचा शोध आधी लागला असेल कि श्रीखंडाचा? म्हणजे "अर्रे दह्यात साखर घालून फार छान लागतं.. आपण दह्यातलं पाणी काढून टाकून साखर घातली तर?" असा प्रश्न आधी पडला असेल कि "अर्रे माझी आई घट्ट दही आवडतं म्हणून आई कधी कधी दही चक्क  टांगून ठेवते... म्हणून आम्ही त्याला चक्का म्हणतो...त्या चक्क्यात साखर घालून खाल्ली तर?" असा प्रश्न आधी पडला असेल? 

इन एनी केस श्रीरंगची आई फार स्मार्ट! घीवर, पुरणपोळ्या, करंज्या, जिलबीसारखे लाड करत बसण्यापेक्षा मुलाला दही-साखरेची सवय आणि गोडी लावली... वरून स्पेशल फिल करवण्यासाठी नावही "श्रीखंड" दिलं. 



श्रीरंगच्या आईप्रमाणे माझं लग्न झाल्यावर मी नवऱ्याला "आमच्याकडे सणासुदीला श्रीखंडच लागतं" हे पटवून दिल्यामुळे किमान गुढी पाडवा आणि दसरा हे श्रीखंड स्पेशल असतात. होळी आणि श्रीखंड हे समीकरण मी स्वतःलाही पटवून देऊ शकत नाही. 

लहान असताना जेव्हा बाबा चक्का घेऊन यायचे तेव्हा मी माझ्या मनाची तयारी करून ठेवायचे. श्रीखंड सोप्पा पदार्थ असल्याने आमच्या स्मार्ट आईसाहेब श्रीखंड करायची जबाबदारी आमच्यावरच टाकायच्या... त्या काळात  साखरेचा  बुआ-बाऊ झालेला नसल्याने जेवढ्यास तेवढी साखर घालून मिक्स करून ते पुरणयंत्रातून काढायचं असायचं. सुरुवातीला जेव्हा श्रीखंड व्हायला लागतं तेव्हा मस्त वाटायच पण नंतर काही वेळाने हात-पाय, पुर्ण्यान्त्र , पातेलं सगळं उगाच चिकट व्हायचं. सगळ्यात त्रासदायक गोष्ट असायची ते यंत्र नंतर साफ करणं. स्वतः इतका महत्वाचा पदार्थ केल्याच्या आनंदात ते सगळे कष्ट मात्र माफ! 

अमेरिकेत आल्यावर सुरुवातीला एक वर्ष दुकानातूनच श्रीखंड आणलं होतं. मात्र त्याला घरच्या चक्क्याच्या श्रीखंडाची मज्जा नाही म्हणून मग एका पाडव्याला/दसऱ्याला घरी छान घट्ट श्रीखंड केलं. मुक्तहस्ते केशर-पिस्ते घातले आणि तेव्हापासून नो लुकिंग back! तर रेसिपी द्यायची ठरवलं आहे म्हणून: 

श्रीखंड 

साहित्य: 
दही ( १किलो किंवा ४ मोठ्या वाट्या )
साखर ( दीड-दोन वाट्या अर्थात आपापल्या चवीनुसार) 
केशराच्या ५-7 काड्या 
दुध (पाव छोटी वाटी )
वेलची पूड (एक छोटा चमचा )

कृती:
१. ज्यादिवशी श्रीखंड हवं त्याच्या आदल्या रात्री  दही कॉटन किंवा तत्सम मऊसूत कापडात (पंचा ह्या कामासाठी उत्तम) बांधून टांगून ठेवा. दह्यातलं जाणारं पाणी तुम्ही पोळ्या-भाजीत वगैरे वापरू शकता. (मी किचन सिंकमधल्या नळाला ही पोटली बांधून ठेवते)

२. सकाळी चक्का तयार असेल. हा चक्का एका मोठ्या पातेल्यात काढून घ्या. वापरलेल्या दह्याच्या साधारण अर्ध्या प्रमाणात हा चक्का होतो. आता त्यात चवीनुसार दीड ते दोन वाट्या साखर घाला. शक्यतो बारीक साखर वापरा. काहीजण पिठीसाखरही वापरतात. 

३. पाववाटी दुधात केशराच्या काड्या काहीवेळ भिजत घालून हे दुध काड्यानसहित चक्का-साखर मिश्रणात घाला. 

४. वेलची पूड घाला. 

५. छानपैकी १-१०० ४-५दा म्हणत डावाने हे श्रीखंड घोटून घ्या. 

सर्व्ह करण्याआधी फ्रीजमध्ये ठेवू शकता. ह्याच श्रीखंडात सुकामेवा घालू शकता. फळं कापून घालू शकता. आमरस घातलात तर आम्रखंड करू शकता. करता येण्यासारखं खूप आहे पण केशर-वेलची तशी पुरेशी असते. 

श्रीखंडाची पोस्ट टाकून आता पुढच्या सणाची वाट बघत बसले आहे. 




Comments

  1. श्रीरंगच्या आईप्रमाणे माझं लग्न झाल्यावर "मी नवऱ्याला" आमच्याकडे सणासुदीला श्रीखंडच लागतं" हे

    he kadhi zal? no khabarbat .. Congratulations Deepika!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts