दोडका आणि मेथीची भाजी (Dodka Methi Bhaaji)
एकतर ह्या ब्लॉगवर कायम लिहीत नाही... आणि आज लिहित्ये तर काय "दोडका आणि मेथीची भाजी"?
पण काय हरकत आहे नं? मस्त असते राव, दोडका आणि मेथीची भाजी!
एक म्हण आहे "गरज ही शोधाची जननी आहे" तसं हल्ली माझ्याबाबतीत गरज ही "ok google now"ची जननी आहे. फ्रीजमध्ये मेथी आणि दोडका "आता मी.. आता मी" म्हणत रोज माझ्याकडे बघत होती. पण (नवऱ्याच्या) आवडीच्या भाज्या आधी करून झाल्या आणि ही दोघं उरली बिचारी तशीच.. आज आता काहीच पर्याय उरला नाही तेव्हा दोडका-मेथीची भाजी करायची ठरवलं. असं combination असलेली भाजी अस्तित्वात आहे हे मला माहित नव्हतं, पण नशीब आजमावून मी खरं काल रात्रीच गुगल केलं आणि वाहशेफ वर रेसिपी मिळाली. रविवारी रात्रीच माझे 'Early Monday Morning Blues' सुरु होतात.
मेथीची भाजी/आमटी/पराठे हा माझा आवडता प्रकार आहे. दोडक्याबद्दल विशेष भावना नाहीत. आई गेल्यावर्षी हॉस्पिटलमध्ये होती त्यावेळी मी घरी भरले दोडके आणि दोडक्यांच्या सालींची चटणी केली होती हे आठवतं आहे. काही गोष्टी उगाच राहतात लक्षात... म्हणजे अगदी शून्य कारण असतं त्या आठवायचं पण दोडका म्हंटल की मला मी तेंव्हा केलेली भाजी आठवते, तेव्हाचं टेन्शन आठवतं, हॉस्पिटलमध्ये जायची तयारी आठवते... आजपण दोडका सोलताना आठवत होते ते , मग नाही केली सालांची चटणी. पण बेस्ट होते बरं का ती चटणीपण..
तर साधारण ही अशी दिसत होती भाजी... मी कशी केली? दोडका सोलला, त्याचे लहान चौकोनी तुकडे केले.
कढईत तेल गरम करून फोडणी केली , त्यात कांदा चिरून घातला, आलं बारीक करून घातलं.. मीठ आणि कांदा-लसूण मसाला घातला मस्तपैकी... मग चिरलेला दोडका घालून छान परतून घेतलं, एक वाफ काढली आणि त्यानंतर मेथी घालून परतलं आणि परत ५ मिंट वाफ काढली. थोडी धने-जिऱ्याची पूडही घातली चवीला.. डन ! स्वतःच्याच रसात छानपैकी शिजतात दोडका अन मेथी.. वरून पाणी घालायची गरज पडत नाही.
मला खूप आवडली भाजी.. अश्या भाज्या केल्या अन कि मला , माझ्यातल्या बायकोला प्रचंड भारी वाटतं.. एकदम जागरूक, जबाबदार सुगृहिणी वगैरे असल्यासारखं.. नवऱ्याला अगदी खूप वगैरे नाही आवडली ( त्याला भाजीत दोडका होता हे कळलंच नव्हतं.) पण खाल्ली कटकट न करता, कारण ते असतंच ना "भाजीत भाजी मेथीची आणि प्रीतीची वगैरे" :D
Comments
Post a Comment