Sourdough Bread

कुठल्याही सुपरमार्केटमधला बेकरी सेक्शन मला प्रचंड आवडतो.. वेगवेगळ्या प्रकारचे, आकाराचे ब्रेड.. कुकीज, मफिन्स, पेस्ट्रीज, केक मस्त वाटतं बघायला आणि त्यांचा वास तर लई भारी असतो. सिल्व्हिया प्लाथ 'बेलजार' मध्ये म्हणते कि " There must be quite a few things a hot bath won't cure, but I don't know many of them. " त्या धर्तीवर मी म्हणेन  " There must be quite a few things a visit to the Bakery won't cure, but I don't know many of them. " 

मी आणि आता माझ्यामुळे माझा नवरा, दरवेळी जवळच्या दुकानात गेल्यावर बराचवेळ तिथल्या बेकरीत फिरत असतो. ( मधेच आठवलं , मी कितीतरी दिवस "बेकारी" करायचे स्पेलिंग बेकरीचं.. Bekary ! )
दरवेळी तिथे फिरत असताना  मी एकतरी वेगळं काहीतरी नवर्याला घ्यायला लावते, माझं ती गोष्ट विकत घेण्यामागे कारणही दरवेळी सेम असतं "भारतात जाऊन घेणारोत का आपण हे असं काही?" .. आणि ते खरं आहे, हिंदुस्थान बेकरी घराच्या इतक्याजवळ आहे पुण्यात, कि जोवर ते असं काही विकायला सुरुवात करत नाहीत , आम्ही ते लांब जाऊन विकत घ्यायचे कष्ट करणार नाही. 

तर ह्यावेळी मी त्याला sourdough bread  घ्यायला लावला... हे इंग्लिशमधेच लिहित्ये कारण मला sour म्हणता येत नाही.. मी कायम गोंधळते (सोर, सोअर, स्वओर, साव) हा शब्द म्हणताना.. दिसायला मस्त मोठ्ठा आणि छान वाटत होता... घरी आल्यावर नवर्यांनी पाकीट फोडून एक स्लाईस काढला आणि एक घास खाल्यावर त्याचं तोंड खूपच वाईट झालं. "आंबट आहे"... आता मला sour म्हणता येत नसलं तरी मला त्याचा अर्थ कळतो. मी नवर्याकडे "ओके मग?" चेहऱ्याने बघायला लागले.. त्याने त्याचा उरलेला स्लाईस माझ्यासमोर धरला.. मी खाऊन पाहिला.. "श्या.. खरंच आंबट आहे" ... म्हणजे मला अर्थ माहित असला तरी तो ब्रेड इतका sour असेल असं अजिबात वाटलं नव्हतं. "मी अजिबात खाणार नाहीये हा" नवर्याने सांगून टाकलं.. मी मनातल्या मनात किमतीला ६० ने गुणलं "महाग आहे हा राजा, फुकट कसा घालवायचा?"

पण त्याने हा ब्रेड न खायचा अढळ वगैरे निश्चय केल्यावर माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हताच... मी गुगल उघडलं आणि sourdough च्या रेसिपीज बघितल्या... आणि मग त्याच्या नकळत ते पदार्थ करायचे ठरवले.. एकदम आम्ही सारे खवय्ये किंवा मेजवानी-रंगतदार रेसिपीज सारखं "मुलं भाज्या खात नाहीत, पराठे करून दिले कि मात्र आवडीने खातात" वगैरे वगैरे.. "नवरा sourdough bread खात नाही , फ्रीटाटा करून दिला कि आवडीने खातो" 


आम्लेट हा प्रकार मला काही विशेष आवडत नाही, फ्रीटाटा आम्लेटचा मोठा भाऊ आहे. जरा जास्त जाड, जरा जास्त भाज्या आणि जरा जास्त लाड केलेला... all you need to do is,  ओव्हनमध्ये लसूण आणि ओलिव्ह ओईल वर ब्रेडचे लहान तुकडे भाजून घ्या जरावेळ... तोवर कांदा, स्क्वाश किंवा काकडी , टोमेटो, जरासं आलं बारीक चिरून मस्तपैकी परतून घ्या...३-४ अंडी फेटून घ्या.. मीठ-मसाला आवडीनुसार घाला... अंडी आणि भाज्या बेकिंग ट्रए  मध्ये ब्रेडच्या तुक्ड्यांसोबत घाला.. वरून जरासं चीज किसा आणि परत ओव्हनमध्ये ठेवून broil.. done! ही बेसिक कृती आहे... ह्यात तुम्ही बाकी काहीही घालू शकता..

फ्रीटटा मी सगळ्यात आधी ज्युनिअर मास्टरशेफ ऑस्ट्रेलियात पाहिला होता... तो किती भारी आहे कार्यक्रम..  भारताला त्याची कॉपी करणं जमलेलं नाही... भारतात मास्टरशेफमधे अतीच नाटकीपणा असतो. अमेरिकेतल्या मास्टरशेफमधे अतीच आगाउपणा असतो.  मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया बेस्ट आहे. 

एकदिवस ब्रंचला फ्रीत्ताता केल्यावर मी ३ स्लाईस संपवू शकले पण उरलेल्या पाकिटाच काय करणार म्हणून आज परत ३ स्लाईस संपवले फ्रेंच टोस्ट करून.. 

२-३ अंडी, मेपल सिरप, vanilla extract, थोडं दुध, दालचिनी पावडर, वाटल्यास जराशी साखर आणि कणभर मीठ मस्त फेटून घ्यायचं... ४-५ मिनिटे ब्रेड त्या मिश्रणात भिजवून ठेवायचा आणि मग थोड्याश्या बटरवर भाजायचा.. नवर्याला त्यावर चीजहि हवं असतं म्हणून जरासं चीज किसायचं... done! एकदम लगेच होऊन जातो हा प्रकार.. नवर्याला दोन्ही प्रकार खूप आवडले..

मगाशी मला म्हणाला " हे दोन्ही ठीक होतं.. चांगलं लागलं होतं.. पण २ रुपयाची गोष्ट वाया जाऊ नये म्हणून २० रुपये खर्च करायचा तुझा हिशोब मात्र कळला नाही मला..." uuff हे नवरे.. ह्यांना कधी काही कळतच नाही.. 

Comments

Popular Posts