काहीतरी


मणिपूरला असताना 'इस्क्वास' रोज खायचे मी.. ढीगभर भात आणि शिजवलेला इस्क्वास माझ्या पानात वाढताना मी मांस-मासे खात नाही ह्यावर हळहळ व्यक्त करायचे ते... नंतर महाराष्ट्रात परत आल्यावर हा स्क्वाश मला कुठेच मिळाला नव्हता. अर्थात मी जास्त शोधायची धडपडही केली नव्हती. अमेरिकेत दिसला आणि मी लगेच उचलून आणला.. म्हणजे विकत आणला पैसे देऊन!

आता फ्लॉवर,बटाटा, मुग, मटकी सोडल्यास इतर कोणत्याही भाज्या, उसळी पाहून नाकं मुरडणारा नवरा मिळालाय मला... त्यांनी स्क्वाश पाहिल्यावर बर्याचवेळ चिकित्सा केली त्या फळाची... आणि शेवटी हे आवडून घ्यायचं कि नाही हे न ठरवता आल्यामुळे फ्रीजमध्ये ठेऊन दिलं. 

खाण्या-पिण्याच्या बाबतीत अतीच लाड झालेत त्याचे... एखाद पदार्थ नाही आवडला तर पानात टाकायचीही मुभा होती त्याला.. अर्थात "होती" , आता माझ्या राज्यात ते शक्य नाही :) आमच्याकडे खूप शिस्त होती त्याबाबतीत... आमचे कुठलेही नखरे कधीच खपवून घेतले जायचे नाही. पानात वाढलेलं सगळं संपवायला हवं अन घरी केलेला प्रत्येक पदार्थ हा थोडातरी खायलाच हवा. बाबा उठूच द्यायचे नाहीत पानातली भाजी संपेपर्यंत.. आणि त्यावर हाईट म्हणून पाढे वगैरे म्हणायला सुरुवात करायचे.. मग मुकाट्याने १५च्या पुढे पाढे पोचण्याआधी भाजी संपवावी लागायची. तेव्हा राग आलाही असेल आई-बाबांचा पण आता कळतय किती महत्वाची सवय आहे ते. आजही माझ्यासमोर कोणी अन्न वाया घालवत असेल तर बाबांचा आवाज ऐकू येत राहतो डोक्यात.. "एकेका दाण्यासाठी शेतकरी किती कष्ट करत असतो..."

तर , मी ह्या स्क्वाशचं काहीही केलं तरी नवरा खाणार नाहीये ह्याची मला खात्री होती. पण करायचं तर होतं आणि त्याला न भांडता खायलाही लावायचं होतं. मग अर्थातच काहीतरी fancy करणं क्रमप्राप्त होतं. (कदाचित मी आयुष्यात 'क्रमप्राप्त' हा शब्द पहिल्यांदाच वापरत्ये वाक्यात)... नेटवर काही विशेष रेसिपीज नाही मिळाल्या... मग काय , saute करा... कांदा, टोमेटो, सिमला मिरची, मश्रूम  आणि स्क्वाश चिरा. जराश्या तेलावर परता. त्यात आवडत असल्यास केचप,सॉस वगैरे घाला... मीठ-साखर भुरभूरवा, हर्ब्स आणि मिरपूड वगैरे घालू शकता... मुळात काय हवं ते घालू शकता... अगदीच हवं ते काहीही नाही.. पण त्यातल्यात्यात काहीही... आणि डन वगैरे! पास्ता सलाड म्हणूनही भारी होईल हा प्रकार... 


नवरा अक्षरशः बोटं चाटत जेवला. थोडे जास्त कष्ट करून (ह्यात जास्त काही कष्ट नव्हते..पण तरी) आपल्या माणसाच्या पोटात वेगवेगळ्या भाज्या जात असतील तर काय हरकत आहे? श्या... लग्नाला ६च महिने झालेत आणि मी आलरेडी मोठ्या माणसांसारखी वागायला-बोलायला लागल्ये का राव? not done!!

Comments

Popular Posts