अल्फाल्फा बटाटा भाजी



लग्नाबद्दलच्या प्रचंड आवडलेल्या गोष्टींपैकी एक महत्वाची गोष्ट म्हणजे "हवी ती भाजी घेऊन या आणि करा"... दर आठवड्याला भाजी घ्यायला गेल्यावर मी आणि नवरा आपापल्या आवडीच्या २-२ भाज्या घेत असतो. खाण्यात हजार नखरे करणारा नवरा हल्ली आपणहून पालक वगैरे घ्यायला लागलाय, मस्त वाटतं ते बघून!
इथे आल्यापासून त्याला आवडायला लागलेला अजून एक प्रकार म्हणजे "अल्फाफाचे मोड" हे दिसायला अगदी आपल्या बारीक मेथीसारखे असतात... बारीक मेथी, माझा एक भारी आवडता प्रकार आहे. (ज्या भाज्या करायला कमी कष्ट लागतात, त्या सगळ्याच भाज्या मला आवडतात. )

तर, मला खूप दिवसांपासून मेथीसारखी भाजी करायचीच होती. आमच्याजवळ कुठेच बारीक मेथी मिळत नाही. मग काल सकाळी केली ही बटाटा-मेथी सारखी भाजी...

एक मोठा बटाटा चिरून घेतला, एक कांदा चिरून घेतला एक टोमेटो प्युरी करून घेतला, फोडणीला टाकलं सगळं..जरा शिजू दिलं , मीठ-मसाला वगैरे .. आणि मग त्यावर धुवून-जरासा चिरून अल्फाल्फा... वाफ..शिजू द्या.. डन!

आई बहुतेक नाही करायची अशी भाजी...घरी अशी भाजी खाल्लेली मला आठवत नाही. मी अशी भाजी शुद्धवतीच्या डब्यात खायचे. शुद्धवती आणि संगीता... नवगावच्या मुली होत्या... नवगावला कोळ्यांची खूप मोठी वस्ती आहे... त्या दोघींचे केस तेल लावून लावून इतके मस्त जाडजूड झालेले होते. कधी दोन कधी एक घट्ट वेणी घालून त्या यायच्या शाळेत... पाचवी ते अकरावी माझ्या वर्गात होत्या दोघी, आणि असा एकही दिवस नसेल जेव्हा त्यांनी केसात काही माळलं नसेल... गजरा, एखादं फुल काहीच नाही तर शतावरीचं पान... स्वभावानी दोघीही इतक्या गोड होत्या... शुद्धवती खूप हुशार होती, पुढे तिने दापोलीहून कॉलेज पूर्ण केलं आणि मग मुंबईला TISS... आता वाटतं एका NGOसोबत आहे. संगीता खूप हुशार नव्हती पण तिची पुस्तकंच्या पुस्तकं पाठ असायची... गणितं सोडवता यायची नाही म्हणून ती एकुणेक स्टेप पाठ करायची गणितातली... तिचं लवकर लग्न झालं, खोपोलीला असते वाट्त,  संगीताचा मुलगा शाळेत जायला लागला आहे असंही ऐकलंय...

शुद्ध्व्तीच्या डब्यात कायम पांढरी शुभ्र भाकरी असायची तांदळाची... एकही डाग नाही! मौसुत एकदम... कोकणातली आहे म्हणून असेल कदाचित, मला तांदुळाची भाकरी सोडून कुठलीच भाकरी विशेष आवडत नाही. रंगातच मार खातात सगळ्या... नाही म्हणायला नाचणीची भाकरी मस्त चॉकलेटी असते*... भाकरी आणि अनेकदा पालेभाज्या असायच्या तिच्या डब्यात... हिरव्यागार... माझ्या डब्यात पोळ्या आणि कमी तिखट, मिरच्या न घातलेल्या भाज्या किंवा कोशिंबिरी... कधी कधी आई गोड थालीपीठ द्यायची डब्यात... शुद्ध्वती 'दशमी' म्हणायची त्यांना... तिला खूप आवडायचा तो प्रकार... ज्यादिवशी माझ्या डब्यात दशम्या असतील , मी डबा न उघडता शुद्ध्वतीला नेऊन द्यायचे... ती डबा उघडून मासे नाही ना बघायची आणि मला तिचा डबा द्यायची... वॉव... आम्ही दोघी इतक्या खुश असायचो..

मी केलेली भाजी तिच्या डब्यातल्या भाजीच्या जवळही जाणारी नव्हती... सोबतीला तांदळाची भाकरीही नव्हती... पण मज्जा आली... भाजी नवऱ्यालाही आवडली... त्यानेच मेसेज केला "लिही ना शुद्धवती बद्दल"
म्हणून...



* (healthy खायला घालायचं म्हणून मी माझ्या मुलांना नाचणीची भाकरी चॉकलेटची आहे असं म्हणून भरवणार आहे. नवरा असं काही ऐकून म्हणतो "मला काळजी वाटते आपल्या मुलांची")

Comments

Popular Posts