गाजराचे घावन (Gaajarche Ghaavan)

गाजर भाजी म्हणून कन्सिडर करतात का ते माहित नाही... पण तरीही माझी आवडती भाजी म्हणून मी गाजर सांगू शकते! (गाजर देऊ शकते वगैरे खेळ करणं मी मनापासून टाळते आहे ह्या पोस्टमध्ये)
मला चष्मा लागल्यापासून गाजराबद्दलचं माझं प्रेम जास्त वाढलंय.. मी एकदम हेल्दी होईन, रोज गाजर खाईन, सकाळी गवतावरून अनवाणी चालीन आणि चष्म्याचा नंबर कमी करून दाखवीन ही माझी लहानपणासून (१२वी) सुप्त इच्छा आहे. मला चष्मा लागून १० वर्षं झाली हे अचानक जाणवलं आत्ता...  १० वर्षांत चष्म्याच्या नंबरनी इमानेइत्बारे वाढायचं काम केलेलं आहे.

तर, गाजर... गाजराचा रंग हा माझा पहिला आवडता मुद्दा आहे.  नारिंगी म्हणू शकतो का गाजराच्या रंगाला?
दुसरं म्हणजे त्याचा करकरीतपणा... आणि तिसरी चव! गाजराची कोशिंबीर ही  माझ्या आवडत्या पदार्थांपैकी टॉप वीसमध्ये येईल. लहानपणी आठवड्यातून किमान एकदा आई मला डब्यात गाजराची कोशिंबीर आणि पोळी द्यायची. गाजराचा हलवा हा प्रकार मला तेवढाच आवडतो. तुम्हांला माहित्ये का, गाजर खूप भारी शस्त्र म्हणूनही वापरता येतं... युट्यूब वर "shoot em up carrot scene" सर्च करून बघा. खाण्या-पिण्याचा ब्लॉग असल्याने तो व्हिडीओ इथे टाकत नाहीये, पण थोडक्यात हिरो एका गुंडाला गाजरानी मारतो.


हे ते घावन आहेत ज्यांच्याबद्दल मी लिहिणं अपेक्षित आहे. फोटो क्वालिटीबद्दल आधीच्या पोस्ट वाचाव्यात...

मी एकदा मला आवडते म्हणून खूप खूप गाजराची कोशिंबीर केली. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांत, तोवर दोन जणांच्या स्वयपाकाचाही अंदाज नव्हता.. नवऱ्याला गाजराची कोशिंबीर म्हणावी तितकी आवडली नाही. त्यामुळे बरीच उरली. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच पानांत वाढायला मला जरा गिल्टी वगैरे वाटलं म्हणून हा प्रकार अस्तित्वात आला... गाजराची कोशिंबीरीत थोडं बेसन, तांदुळाचं पीठ आणि कणिक घातली. आलं लसूण पेस्ट, तिखट-मीठ , ओवा, पाणी घालून पातळ मिश्रण केलं आणि घावन घातले. चांगले झाले  ते एकदम.. तेव्हापासून मग मुद्दाम गाजराचे घावन करायला लागले. मस्तपैकी तुप लावून शेंगदाण्याच्या चटणीसोबत खायचे हे घावन... भारी लागतात! नेहमीच्या घावनांपेक्षा रंगही छान दिसतो.

नवरा हा प्रकार आवडीने खातो. मी जेव्हा जेव्हा घावन, थालीपीठ, डोसा करते मला आईची खूप आठवण येते. साधारण हे असे प्रकार शनिवार-रविवारी असायचे. सकाळी आई हे असं काहीतरी करत असायची, गरमागरम वाढत असायची... आणि मग शेवटी rejected batchमधले किंवा शेवटच्या उलेल्या पिठातले  गार झालेले घावन/डोसा/थालीपीठ घेऊन खात असे...  मग कधीकधी बाबा तिला करून द्यायचे नंतर गरम खायला... किंवा मी आणि दिपू मोठी झाल्यावर, आम्ही करायला लागायचो मदत तिला...पण वाटतं मी कधी इनफ मदत केलीच नाही आईला... माझा नवरा जेव्हा मला घावन घालून देतो आता त्याचं खाऊन झाल्यावर, मला गरम मिळावेत म्हणून ,  तेव्हा कोणी आपल्यासाठी गरम काहीतरी बनवून देण्यातलं सुख कळतं. काही  बेसिक गोष्टी समजायला एवढा जास्त वेळ का जावा लागतो?





Comments

Popular Posts