Waal-E

अगदी उगाच शेवटच्या सेकंदाला हे पोस्टचं नाव लिहिलं आणि आवडलं मला जाम... कारण वाल हा प्रकार मला जेवढा आवडतो त्यापेक्षा कैकपटीने जास्त  wall-e  आवडतो. म्हणजे दोघांमध्ये शून्य संबंध आहे पण जाउदे ना...

तर आज आमच्याकडे वालाची उसळ होती. मी अनेकांना अनेकदा सांगते म्हणून इथे एकदा लिहून टाकते, कडधान्यांची करतात त्याला उसळ म्हणतात, भाजी म्हणत नाहीत! मुगाची भाजी नसते... उसळीची भाजी त्याहून नसते... आणि त्यावरूनच आठवलं, साबुदाण्याची खिचडी असते, उसळ नाही! बास.. झालं सांगून.. आता पोस्टकडे वळूया.

आधीच्या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे माझ्याकडे चांगला camera नाही. नेक्ससच्या front cameraतून कसरत करून फोटो काढावे लागतात. त्यातून कसाबसा काढलेला हा वालांचा फोटो.. 'आता नाही येत धड फोटो काढता तर फोटो अपलोड करायचा उपद्व्याप का?' ह्या प्रश्नाचं उत्तर अजूनतरी मला सुचलेलं नाही... असते एकेकाची हौस म्हणायचं आणि सोडून द्यायचं...

भारतातून येतानाच एक "बिग वाल" लिहिलेली पुडी आणली होती सोबत. फार पूर्वी कधीतरी तरला दलालची "रंगून ना वाल" ची रेसिपी वाचली होती. म्हणजे मला लक्षात नव्हती अजिबातच, पण नाव लक्षात होतं. अमिताव घोषमुळे असेल कदाचित, पण रंगूनबद्दल खूप कुतूहल आहे मला... आणि त्यातून आपल्या शेजारचा देश असून किती कमी माहित्ये आपल्याला ब्रह्मदेशाबद्दल.. "पिया गये रंगुन" मध्ये संपतं माझं ज्ञान.. तर मुद्दा हा कि मग ती रेसिपी शोधली आणि "रंगुन ना वाल" केले.

बिग वाल विकत घेताना माझा विचार होता कि डाळिंब्यांप्रमाणे हे सोलावे लागणार नाहीत, पण असं काही झालं नाही. रात्रभर भिजवून ठेवले, सकाळी सोलले, त्याची एक शिट्टी काढली कुकरमध्ये .. मग फोडणीला टाकले. खोबरं-चिंच-गुळ. मीठ चवीनुसार, वरून कोथिंबीर भुरभुरली. डन!! कांदा-लसूण घालूनही होते मस्त ही उसळ..

वाल सोलत असताना बाबांची खूप आठवण आली. कारण एकदम आत्ता क्लिक झालं कि आईपेक्षा जास्त मला बाबाच आठवतात भाजी सोलताना आणि निवडताना वगैरे.. बाकी सगळं आई करायची..  आणि एक गम्मत आठवली. मी चौथीत असताना आम्ही राजस्थानला गेलो होतो. दररोज तिथले नव्यासारखे जुने किल्ले बघत होतो. एका कुठल्यातरी महालात राण्यांचा कक्ष होता, कारंजी आणि बागा वगैरे... तिथे बाबा मला म्हणाले होते "पूर्वीच्या काळी राण्या इथे बसून डाळींब्या सोलायच्या".. आईशप्पथ मी त्या कारंजाच्या कठड्यावर दोन-तीन चोळी-शरारा घातलेल्या, डोक्यावरून ओढणी घेतलेल्या राण्या डाळींब्या सोलताय्त आणि मागे दास्या त्यांना वारा घालतायत असं  इमाजीन केलं होतं. तेव्हा माझ्या मनात एकच शंका आली होती कि "सालं उडत असतील ना पण इथे".. अगदी आत्ता आत्तापर्यंत मला बाबांच्या गोष्टीत काही वावगं वाटत नव्हतं.  गेल्यावर्षी पुन्हा राजस्थानला गेले होते तेव्हा आठवली बाबांची गोष्ट आणि हसू यायला लागलं मग एकटीलाच.. तेव्हाही डोक्यात पहिला विचार आला होता "राजस्थानात कुठून येणारेत डाळींब्या?इथल्या राण्यांना सोलायला? आह..वेट अ मिन.. पण इथल्या राण्या का सोल्तील स्वतः डाळींब्या?"

वालावरून अजून एक पदार्थ आठवतो तो म्हणजे लिमये काकुंचा पुलाव, डाळिंबी भात... आहाहा बेस्ट होता तो प्रकार.. काही पदार्थ एकदाच खाल्ले तरी खूप खूप लक्षात राहतात ना त्यापैकी एक... खाऊन तृप्त झाले होते मी .. आणि मग काकूंनी सांगितलं कि त्यात त्यांनी "चिकन का मटण मसाला" असं  काहीतरी घातलं आहे. आणि मग मला खूप guilty वाटत होतं कितीतरी दिवस, मग जेव्हा कळलं कि मसाल्यात काही nonveg नसतं तेव्हा हायसं वाटलं होतं.

"वालावलकर" नावाचे कोणी लेखक होते का शैक्षणिक पुस्तकं लिहिणारे? कारण मला उगाच निगेटिव्ह वाटतं ह्या आडनावाबद्दल जसं "वा.ना.दांडेकर" ह्या नावाबद्दल वाटतं. एनीवे तो विषयच वेगळा आहे.

तर अशाप्रकारे आजची मोहीम फत्ते झाली. आणि सलामीची तोफ म्हणून अमोल म्हणाला "अप्रतिम झाली होती गं.. आता मलाही रंगुनबद्दल २ गोष्टी माहित्येत. एक म्हणजे ' पिया गये रंगुन' आणि 'माझ्या पियाने केलेले रंगुन ना वाल' :) हो हो.. नवीन लग्न आहे अजून आमचं! डाळींब्या सोलायचे, भाज्या निवडायचे त्याचे दिवसही येतीलच...

Comments

Popular Posts