सफरचंद किवी स्मुदी (Apple Kiwi Smoothie)


दोन वर्षापूर्वी ह्या ब्लॉगवर एका स्मुदीबद्दल लिहून मी इथून गायबले. आज मुहूर्त लागून इथे पुन्हा एक स्मुदी घेऊन आले आहे. ब्लॉगचं stats बघता, एकतर जास्त काही लोकं इथे येत नाहीत आणि येतात ती बिचारी रेसिपी शोधायला आलेली असतात. ह्याचा आणि बाकी काही मुद्द्यांचा विचार  करता, माझ्या तत्वांना (आळशीपणाला) मुरड घालत पाककृतीही लिहावी असं वाटत आहे.

स्मुदीज बद्दल माझं लव-हेट नातं चालू असतं. दोन वर्षापूर्वी प्रेम आलं होतं, त्यानंतर "अन्हेल्दी, अन-आयुर्वेदिक" वगैरे लेबल्स लागल्यावर स्मुदी प्रकरणाशी कट्टी घेतली होती. आता पुन्हा स्मुदीज बद्दल लोकं चांगलं बोलायला लागलीत तर आमची गट्टी झाली आहे. फॅशन जगातासारखे आहारशास्त्रातले प्रवाहही बदलत असतात. एखादी गोष्ट कधी "इन" असेल तर पुढच्याच महिन्यात "नो-नो" होऊन जाते. जोवर स्मुद्यांना चांगले दिवस आलेत तोवर करून घेत्ये. मग नंतर पुन्हा "पाश्चात्य जगातील अन्न आणि भारतीय अन्न" ह्यावर चर्चा करूच!!

हल्ली आम्ही चहा-कॉफी कमी करतो आहोत. खरंतर सकाळी एकदाच होतो चहा... कॉफी अधूनमधून कधीतरी! पण ते प्रमाणही कमी करायचं आहे. म्हणूनच सकाळी काहीतरी वेग-वेगळं करायचा विचार असतो. सध्या आठवड्यातून २-३दा वेगवेगळ्या स्मुदीज करणं चालू आहे. आजची स्मुदी होती "सफरचंद- किवी स्मुदी"!

अमेरिकेत आल्यापासून सफरचंद आणि दालचिनी ह्या प्रचंड भारी जोडीशी ओळख झाली आहे. ह्या जोडीच्या वासाच्या मेणबत्त्या, परफ्युम्स वगैरेही मिळतात. खरंतर हे हिवाळापूर्व आणि हिवाळा स्पेशल कॉम्बीनेशन आहे. सगळी दुकानं thanksgiving ते christmas दालचिनीच्या वासाने भारलेली असतात.

तर रेसिपीकडे वळूया...

हे प्रमाण दोन जणांसाठीचं आहे.

साहित्य: 
१ मध्यम आकाराचं सफरचंद (सोलून, बारीक तुकडे करून)
१ किवी (सोलून, बारीक तुकडे करून)
१ १/२ कप अल्मंड मिल्क
चिमुटभर दालचिनी

कृती
१. कापलेलं सफरचंद, किवी मिक्सर किंवा ब्लेंडरमधून फिरवून घ्या.
२. ह्या मिश्रणात अल्मंड मिल्क घालून एकत्रित होईपर्यंत पुन्हा एकदा मिक्सर/ब्लेंडरमधून फिरवून घ्या.
३. ही स्मुदी ग्लासमध्ये ओतून घ्या आणि वरून दालचिनी पावडर भुरभूरवा. स्मुदी तय्यार!

टीप:
१. फळं गोड असल्यानी  साखरेची गरज लागत नाही. मात्र तुम्हांला हवं तर चिमुटभर साखर ब्लेंड करताना घालू शकता.
२. तुमचा ब्लेंडर सहन करू शकत असेल तर ब्लेंड करताना बर्फही घालू शकता. उन्हाळ्यात गारेगार स्मुदी छान वाटेल.


मला नुसतं सफरचंद खायचा कंटाळा आहे. हे असं काहीतरी करून सफरचंद खाल्लं जातयं ह्याचा आनंद आहे.
सफरचंदाच्या चिप्सही मस्त होतात बरका... करायला हव्यात!

नोट टू सेल्फ: पुढच्या पोस्टसाठी दोन वर्ष थांबायला नको आता...

Comments

Popular Posts