पोळीचा लाडू (Policha Ladoo)



माझ्या आजवरच्या आयुष्यात 'पोळीचा लाडू' आवडत नाही असा एकही माणूस मला भेटलेला नाही. (असे लोक भेटलेत ज्यांना पोळीचा लाडू काय असतो हेच माहित नाही पण ते पहिल्या वाक्यातल्या सेटमध्ये येत नाहीत)
आणि समजा असा कोणी माणूस असेलच तर त्याला भेटण्यात काही एक अर्थ नाही.

पोळीचा लाडू हा माझा आवडता ब्रेकफास्ट आहे. पण तेवढाच आवडता दुसरा ब्रेकफास्ट आयटम आहे, "फोडणीची पोळी". (जगात इतके भारी भारी न्याहरी पदार्थ असताना आपण शिळ्या पदार्थांना मानाचं स्थान देण्यातच सुखी! ) हल्ली दोन जणांच्या भातुकलीच्या स्वयपाकात सगळं मोजून-मापून असल्याने पोळ्या उरायचा प्रश्न येतच नाही. कधीतरी दुर्मिळ प्रसंगी  पाहुणे आल्यावर जास्त पोळ्या झाल्याच तर मात्र दुसऱ्या दिवशी प्रचंड मोठा प्रश्न उभा राहतो... पो.ला. कि फो.पो.?  नवऱ्याला माझ्याइतकं गोडाचं प्रेम नसल्याने त्याचं मत कायमच फो.पो ला असतं. मग कधीतरी अश्यावेळी त्याचं मत ग्राह्य न धरता मी पो.ला करते.  :)

पोळीच्या लाडवाची काय ती रेसिपी द्यायची? म्हणजे अशी काही मोजूनमापून  रेसिपी नसतेसुद्धा... सगळं कसं अंदाजपंचे असायला हवं . कमीत कमी ३-४ कालच्या पोळ्या (चपाती इफ यु विल) हव्यात. हाताने पोळ्या कुस्करु शकताच पण तेवढा वेळ नसल्यास आणि धीर धरता येत नसेल तर पट्कन मिक्सरमधून फिरवून घ्या. आता ह्या कुस्क-यात मुक्तहस्ते (४ पोळ्यांना २ चमचे पुरावं) तूप घाला. २-३ चमचे किसलेला गुळ घाला आणि हे मिश्रण छान मळून त्याचे लाडू वळा. मिश्रण कोरडं वाटत असेल तर दुधाचे चार थेंब घालू शकता.

सुकामेवा-वेलची पावडर-केशर हे असले लाड मुळ्ळीच करायचे नाहीत. गरजच नाही! लाडू वळतानाच ओट्यासमोर उभं राहून मोठे लाडू करून उरलेल्या थोड्याश्या मिश्रणाचा छोटा लाडू करून खाऊन टाका. तुम्ही लाडू वळताय त्यामुळे त्या छोट्या लाडवावर तुमचाच हक्क आहे.

आता आज-उद्या जाऊन दुकानातून अर्धा डझन पोळ्या/फुलके काहीतरी आणायला हवं. अमोलला काय हवंय विचारून मग आपल्या आवडीचे पो.ला पुन्हा करायला हवेत.




Comments

Popular Posts